प्रत्यक्षाहुनी... प्रतिमा उत्कट !
विठ्ठल पांडे
जुन्नर, पुणे.
आयुष्यातल्या एका विशिष्ट टप्प्यावर माणसं खरं खरं बोलू लागतात का? विशेषतः काही गमवायचं नसतं तेंव्हा? किंवा आपल्या खरं खोटं बोलण्याने आपला किंवा इतर कुणाचा फायदा तोटा होणार नसतो तेंव्हा?
मी अलीकडेच टीव्ही वर भारत वेस्ट इंडिजची क्रिकेट मॅच पाहत होतो. कॉमेन्टरी बॉक्स मध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग होते. १९९९ च्या विष्वचषकात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी भागिदारी केली होती. सौरवने चौकार षटकारांची बरसात करत १८३ रन्स ठोकल्या होत्या. विरेंद्र सेहवागने या खेळीची आठवण काढल्यावर सौरव म्हणाला, उसमें कुछ खास बात नहीं, वह ग्राऊंड ही छोटा था । सेहवाग म्हणाला, दादा, फिर भी छक्के तो छक्के होते है । त्यावर गांगुली म्हणाला, उस दिन मेरे मिस् हिट भी छक्कों में तबदिल हो रहे थे। मला इतकं हसू आलं. मला वाटलं आपले एकेकाळचे आयडॉल असेच अपघाताने हिरो झाले असतील का ?
ABP माझावर रविवारी ' माझा कट्टा ' वर दिलीप प्रभावळकर आले होते. अँकरने त्यांना चिमणराव गुंड्याभाऊ मालिका प्रचंड यशस्वी होण्यावरून 'टीव्ही स्टार ' म्हटल्यावर प्रभावळकर हसत म्हणाले, त्या वेळी तेवढी एकच मालिका टीव्हीवर सुरु होती. एकच वाहिनी एकच मालिका. नॉन महाराष्ट्रियन लोकांना सुद्धा बघावीच लागे. यशस्वीतेचा नवाच मापदंड प्रभावळकरांनी खुला केला.
' आपकी अदालत ' मध्ये रजत शर्मांबरोबर ऋषी कपूरने एक किस्सा शेअर केलाय. तो म्हणतो, मी शुटिंग आटोपल्यावर सिमल्यात फिरत होतो. तर काही उत्साही फँन्स मला भेटले. ते मला म्हणाले, आम्हाला गिटार वाजवून दाखवा. मी म्हटलो, नाही येत मला. मग लोक म्हणाले, बासरी ? ती ही नाही. लोक दुकानातच बसले होते. डफली पुढं करत ते म्हणाले, किमान डफलीवाले मधली डफली तरी ? मी म्हणालो, मी यातलं काहीच करु शकत नाही. मी फक्त तुम्हाला मूर्ख बनवू शकतो ! माझ्या डोक्यातला सुपरस्टार ऋषी कपूरने डायरेक्ट जमीनीवर आणला. माणसं अशीच अभावितपणे खरं बोलून जातात का ?
राज्यसभा चँनेलवर इरफान नावाचे एक अँकर ' गुफ्तगू ' नावाचा एक ' टॉक शो ' चालवतात. तिथं येणारी माणसं कितीही मुखवटे चढवून येऊ द्या. इरफान त्यांचा अस्सलपणाच खुला करतात. तिथं त्यांनी कंगना रानौतची घेतलेली एक मुलाखत आहे. कंगनाने इंडस्ट्रीतल्या भल्याभल्यांची अशी काही पोलखोल केलीय की आजवरच्या मनातल्या प्रतिमांचा चक्काचूरच व्हावा.
नरसिंहराव- मनमोहनसिंह या जोडगोळीला भारतातील उदारीकरण खाजगीकरणाचं श्रेय दिलं जातं. याबद्दल एका मुलाखतीत त्यांना छेडलं असता नरसिंहराव म्हणाले, पुरी दुनिया एक मोडपर थी । क्या करें ? हमें मुडनाही पडा ! आपल्याला ऐतेहासिक वगैरे वाटणारा निर्णय किती अपरिहार्यतेतून घेतलेला होता हे आपल्याला कळून चुकते.
मागे एक माजी मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जाहिर कार्यक्रमात असं म्हणाले होते की, सगळं आपणंच खाऊ नका. २० % तरी लोकांपर्यंत जाऊ द्या. सत्य असंच बेसावध क्षणी वर येत असेल ?
पत्रकार अशोक जैनांनी 'अत्तराचे थेंब' या पुस्तकात एक आठवण सांगितलीय. दिल्लीत एक महिला पंतप्रधान ज्यांची प्रतिमा जगभर कणखर पोलादी अशी आहे त्यांच्या सूनेबरोबर (ज्या अलिकडे केंद्रिय मंत्रीही होत्या ) कडाडून भांडल्या. सूनेला घर सोडून जायला सांगितलं.निघून जाताना सोबत घेतलेलं एक भांडं माझं आहे म्हणून वितंडवाद घातला. एखादी स्री सर्व शक्तिमान पदावर पोहोचली तरी तीही एक छोट्या छोट्याअहंकाराने भरलेली सामान्य स्रीच असते हे बघून आपण मनोमन रंगवलेल्या उत्कट प्रतिमेला धक्काच पोहोचतो.
मी शाहरुख खानची कुठलीशी मुलाखत ऐकली होती. त्याच्या अफाट कामाची स्तुती सुरु झाली तेंव्हा तो असं म्हणाला की, ये तो मेरा काम है। इसीसे मेरी रोजी रोटी चलती है। म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या ऐन उमेदीतल्या वर्षांतील बराच वेळ सिनेमाच्या स्वप्नाळूपणात घालवत होतो तेंव्हा खरं म्हणजे हे लोक त्यांचं काम करत होते !
सिनेमा आणि राजकारणाची जास्त उदाहरणं देण्याचं कारणच हे की या दोन क्षेत्रांतचं प्रतिमा निर्मितीचे कारखाने सतत सुरु असतात.
आजचे थोर वगैरे कार्य करत असल्याचा डिंगोरा पिटणारे आणि महान भासणारे लोक असेच काचकड्याचे असतील का ? काही काळाने ते ही गोष्ट मान्य करतील का ? भक्तगणांच्या भाबड्या भक्तीच्या फुग्याला त्यावेळी टाचणी लागेल का ? सामान्य माणसांचा कैवार घेऊन देशव्यापी आंदोलन छेडणारे एका टप्प्यावर आम्ही सगळ्यांना टोपी घातली असं खुलेपणाने मान्य करतील का ?
लहानपणी सर लोक वर्गात शिकवताना काहीबाही सांगायचे आणि आपल्याला ते थोरंच वाटायचं. पुढं पुढं थोडी समज आल्यावर, वाचन वाढल्यावर कळून चुकलं की सर सांगत असलेल्या बर्याच जणांचे पाय मातीचेच तर आहेत ! कॉलेजमध्ये असताना कुणीही अमुक तमुक प्रमुख पाहुणा आपण देशासाठी हसत हसत फासावर गेलं पाहिजे असं चमकदार बोलून जायचा आणि आपल्याला वाटायचं की देशासाठी आत्ताच्या आत्ता मरून जावं. नंतरच्या काळात कळून चुकलं की असं काही नसतं. तडजोडी करतंच तुम्हाला जगावं लागतं. बाकी आदर्श वगैरे भारावून जाण्यापुरतं ठीक आहे !
सारांश काय तर माणसं साधी, सहज, सोप्पी, सरळ कधी नसतातंच का ? की ती थेट महान थोर वगैरेच असतात ? उलट तुम्ही जितकी प्रतिमांपलीकडे जाऊन माणसं बघता तितकी ती तुम्हाला अस्सलपणे जाणवतात. प्रतिमांची लेबलं उतरवली की तुम्हाला खरीखुरी माणसं समजून घेता येतात. माणसं अधिक कळतात.पारखता येतात. त्यांची चिकित्साही करता येते. राख झटकली की जसे निखारे अधिक उजळतात तशी महान वगैरे प्रतिमांची लोढणी उतरवली की माणसांचे वेगळे वेगळे कांगोरे तुम्हाला अनुभवता येतात.
पण उत्कट प्रतिमेची झापडं जोवर डोळ्यांवरुन उतरत नाहीत तोवर प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट हा खेळ सुरुच राहणार !
Comments
Post a Comment