थीमबेस माईंड मँप शिकणं

*वर्गातल्या सर्व मुलांना बोलतं-शिकतं करायचा प्रयत्न करत असताना एक चांगलं साधन हाती आलं. मुलं बोलू-लिहू लागली म्हणजेच शिकती झाली. या प्रयत्नांविषयी लिहिलेला 'मुलांच्या मनाचा दरवाजा उघडताना...' हा माझा लेख आज(रविवार, तारीख १ सप्टेंबर) ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालाय. शक्य असल्यास जरूर वाचाल.*

*मुलांच्या मनाचा दरवाजा उघडताना...*

- *_भाऊसाहेब चासकर_*

मुलांच्या जगण्यातले जिवंत अनुभव वर्गात-शाळेत आले पाहिजेत, शिकणं मुलांच्या जगण्याशी म्हणजे त्यांच्या अनुभवविश्वाशी, भावविश्वाशी जोडलं पाहिजे, असा शिक्षणशास्रीय सैद्धांतिक आग्रह अभ्यासक्रमासारखे शिक्षणाशी संबंधित बहुतेक धोरणात्मक दस्ताऐवज धरतात. शिक्षक प्रशिक्षण वर्गांतूनही असंच सांगितलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात असं कसं शिकवायचं, वर्गात नेमकं काय करायचं, याचं प्रारूप न ठेवल्यानं शिक्षकांना स्पष्टता येत नाही. ‘चार-दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचं तूप खाऊन, नवोन्मेषी अध्यापनाचं रूप यावं,’ अशी अपेक्षा मात्र केली जाते. इथं शिक्षकांची मोठी गोची होते. चांगल्यात चांगल्या शिक्षकाचं शिकवणं एकाच वेळी वर्गातल्या सगळ्या मुलांना अपील होणारे असेलच असे म्हणता येत नाही. कारण मानसशास्रीयदृष्ट्या प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाच्या शिकण्याची गती व्यक्तीपरत्वे बदलत जाते. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत कसं सामावून घेता येईल, शिक्षण प्रक्रिया सगळ्यांना आपलीशी कशी वाटेल, त्यासाठी काय करता येईल, हा विचार मनात घोळवत होतो. एके दिवशी परिपाठात पाणी या विषयावर बोलताना आत कुठंतरी लख्ख उजेड पडला. कवडसा हाती आल्यासारखं वाटलं. त्याच दिवशी दुसरीच्या वर्गात प्रयोग करून बघितला.

पाठ्यपुस्तकातला ‘भाकरीची गोष्ट’ हा पाठ पारंपारिक पद्धतीनं, वाचून अर्थ सांगून भाषण पद्धतीनं न शिकवता जरा वेगळा प्रयत्न करून शिकवला. ‘भाकरीची गोष्ट’ असं फळ्यावर लिहिलं. या थिमविषयी मुलांना विचार करायला थोडा वेळ दिला. मुलांना विचारलं, भाकरी म्हटलं की मनात, डोळ्यांसमोर काय काय येतं सांगा. सुरुवातीला मुलांनी थोडासा वेळ घेतला. विषय लक्षात आल्यावर एकेक करत मुलं शब्द, वाक्यं सांगत राहिले. आता मुलांना थांबवणं अवघड होऊन बसलं. ‘सर, मी सांगू, मी सांगू...’ असा गलबला सुरू होता. भाकरीविषयी बोलताना मुलांनी कमाल, धमाल केली. बाजरी, नाचणी, ज्वारी, तांदूळ अशा कोणत्या धान्यांपासून भाकरी बनते. ऋतू, पीकपाणी, सिंचन, मजुरी, मशागतीची साधनं, पेरणी, निंदणी, कापणी, मळणी, धान्य साठवणं अशी सगळी प्रक्रिया क्रमबद्ध रितीनं आली. पाऊस पडला नाहीतर पिकं करपून जातात. खूप पाऊस पडला तर पिकं सडतात. धान्य तयार झालं की सुपडणं-पाखडणं, दळण करणं, गिरणीतून दळून आणणं, पीठ मळणं, भाकरी थापणं, तव्यावर कौशल्यानं टाकणं, ती भाजणं, हाताला बसणारे चटके असं सारं सारं आलं. जातं, चूल, काठवटीपासून तर भाकरीचा आकार गोल असतो, भाकरी फिरवली नाहीतर ती करपते इथपर्यंत रसरशीत आंतरक्रिया सुरू होती. गरज पडल्यास हिंट देऊन, एखाद्या मुद्याची भर घालत संवादाचा खळखळणारा प्रवाह अखंड सुरू कसा राहील, हे बघत होतो. शब्दकड्यांची साखळी तयार होत होती. दिलेल्या थिमच्या अनुषंगानं मुलं कनेक्शन्स तयार करत होती. हा अनुभव अत्यंत रोचक आणि उत्साहवर्धक होता.

अगदी आजही लख्ख आठवतेय, त्या दिवशी वर्गातली सगळी मुलं बोलू लागली होती. एरवी एखादा विषय शिकवताना चर्चेत विशेष सहभाग न घेणारी काहीशी लाजरीबुजरी मुलंदेखील थोड्याशा प्रोत्साहनानंतर अत्यंत धिटाईनं बोलती म्हणजे वेगळ्या अर्थानं शिकती झाली होती. दोन दशकांच्या नोकरीच्या वाटचालीत इतका जिवंत वर्ग मी कधीही अनुभवला नव्हता! पाठ्यपुस्तकांतले पाठ शिकवतानाच अभ्यासक्रम नजरेसमोर ठेवून गरजेनुसार एखादी थीम ठरवून त्याभोवती केंद्रित होणारी चर्चा फलदायी ठरतेय, असं लक्षात आल्यावर गेल्या तीन वर्षांपासून या उपक्रमावर लक्ष केंद्रित केलं. एकाच अक्षराचा समावेश असलेले शब्द, जोडाक्षरे, विशिष्ट अक्षर शेवटी येणारे शब्द. पुढच्या वर्गात गेल्यावर शाळा, शिक्षक, पाऊस, जंगल, पाणी, गाव, घर, शेती, शेतकरी, नदी, हिवाळा, उन्हाळा, जन्मदिवस, आई-वडील, सुटी, वाहने, प्रवास, सण, जेवण, नातेवाईक, रंग, मंदिर, भीती, रस्ता, दिनदर्शिका, खेडेगाव, शहर अशा कितीतरी विषयांवर आम्ही वर्गात बोललो आहोत.

अगदी उदाहरण घेऊन तपशिलात सांगायचं तर तिसरीच्या वर्गात आम्ही ‘दूध’ या विषयावर बोललो. सुरुवातीला मुलांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, मांजर अशा दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांची नावं सांगितली. वाघीण, सिंहीण अशी जंगली प्राण्यांची नावं सांगताना फक्त आया दूध देतात, हे मुलांनी अधोरेखित केलं. दही, ताक, तूप, बर्फी, लस्सी, बासुंदी, श्रीखंड, खवा, पेढे, पनीर, आईसक्रिम, खरवस(मुलांच्या भाषेत कवळं दूध) या दुधापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची नावं आणि चवी मुलांनी सांगितल्या. सकाळी लवकर उठून दुधाच्या धारा काढायचं काम आई करते, बादली किंवा चरवीत दूध काढताना येणारा आवाज एका मुलानं वर्णन करत सांगितला. गाय, शेळी यांच्या स्तनाच्या आकार-रचनेतील फरक सांगताना कोण जास्त दूध देते हे सांगितलं. वासरं, बकरं आईचं दूध पिताना कशा ढूशा देतात, किटलीत दूध घेऊन वडील डेअरीवर जातात. दूध विकून आलेले पैसे वडील स्वत:कडं ठेवून घेतात, आईला देत नाहीत. अशी मुलांची माहिती आणि निरीक्षणं इंटरेस्टिंग होती. दूध लीटरमध्ये मोजतात, दुधात कॅल्शियम असते, अशी विशेष माहिती काही मुलांनी होती. ते ऐकून थक्क व्हायला झाले. पुढं जाऊन मुलांनी जर्सी, होस्टेन, गवळीवाल्यांच्या गायी(गीर), गावठी(डांगी) अशा गायींच्या जाती सांगितल्या. गायींना चारा जास्त वेळेस आई घालते. कोणत्या प्रकारचा चारा खाऊन गायी जास्त दूध देतात, हेही शेतकरी मुलांना नेमकं माहिती होतं. दुभत्या जनावरांना पाणी कमी पाजलं तर दूध कमी मिळतं. (इथं आधुनिक पद्धतीच्या गोठ्यांविषयी शिक्षक मुलांना जास्तीची माहिती देतात. मुलांची उत्सुकता वाढते. आपण असे गोठे बघायला जाऊ, असं वर्गात ठरतं.) कोजागिरीला दूध आटवतात इथपासून भाव नसल्यावर शेतकरी दूध रस्त्यावर ओततात, इथपर्यंत वळणं घेत चर्चा सुरू होती. तिसरीच्या वर्गात इतकी रसभरीत चर्चा झाली. हाच वर्ग आठवी-नववीचा असता तर दूधधंदा हा कसा शेतीपूरक जोडधंदा आहे, दूध शीतकरण केंद्र त्यातले विज्ञान, फॅट-डिग्री आदी बाबींविषयी मुलांनी खोलात शिरून सांगितलं असतं. कोल्हापूर-सांगलीतल्या महापुरामुळं मुंबईचा दुधपुरवठा कसा थांबला, दूध संघ त्यातले राजकारण, दूध प्रक्रिया उद्योग आणि विविध उत्पादनं हे मुलांच्या बोलण्यातून येऊ शकलं असतं. आमच्या नगर जिल्ह्यात कृत्रिम दुधाविषयी कायम चर्चा झडत असते, त्यातले काही मुद्दे येऊ शकले असते.

थीम घेऊन शब्द-वाक्ये यांच्या सहसंबंधाचे कनेक्शन तयार करताना मुलांनी पाऊस, झाड, आई-वडील, देव यांना प्रश्न विचारले आहेत. शिवाय किराणा दुकानदार, शेतकरी यांच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार केलेत. वारंवार होणाऱ्या वर्गचर्चेतून मुलांना भरपूर नवीन शब्द माहिती झालेत, प्रश्न विचारता येत आहेतच. मुलं अवांतर वाचन करत आहेत. तिसरीतल्या ११ मुलांनी शंभरहून अधिक चरित्र-गोष्टींची पुस्तके वाचलीत. मुलांना भाषा शिक्षणाची गोडी लागलीय. मुलांनी लिहिलेल्या गोष्टी प्रतिष्ठित नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(२००५) हा देशाच्या शिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. मुलांचं जगणं आणि शिकणं यातली दरी कमी पाहिजे, असा आग्रह हा अभ्यासक्रम आराखडा धरतो. पाठ्यपुस्तकांमधल्या गद्य-पद्य पाठांत वंचित मुलांची भाषा, संस्कृती यांना स्थान नसते, असे टीकाकारांचे आक्षेप आहेत. अशा प्रकारच्या थिमबेस्ड शिकण्यातून अनेक गोष्टी सहज साध्य होतात. दिलेल्या विषयाशी संबंधित शब्द, वाक्य सांगताना मुलं गोष्टी स्वत:च्या जगण्याशी जोडून त्याकडं डोळसपणे बघू लागतात. एखादा शब्द, वाक्य कोणी सांगितल्यावर इतर मुलांना त्यातला मुद्दा नीट समजला नाही तर संबंधित मूल जास्तीची माहिती सांगते. वर्गात उत्स्फूर्त चर्चा होते. समोर येऊन उभं राहून बोलण्यातून मुलं बोलकी, धीट होतात, चिकित्सक बनतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. एखादी समस्या मुलांसमोर ठेवली की ती सोडवण्याचा विचार मुलं करु लागतात. समस्या निराकरण, निर्णयक्षमता अशी जीवन कौशल्ये आत्मसात होण्यास चांगली मदत होते.

मुलांना नवे शब्द समजतात. इथं मुलं आणि त्यांच्या भाषेचा स्वीकार होतो. त्यामुळं शाळा-शिक्षण-शिक्षक मुलांना आपलेसे वाटू लागतात. खेरीज मुलांचं एकूण जगणं शिक्षणात, वर्गात येत असल्यानं वर्ग म्हणजे समाजाचं चित्र बनतो. याखेरीज दिलेलं उत्तर बरोबर असेल अशी खात्री आधीच दिलेली असल्यानं ‘माझं उत्तर चुकलं तर..?’ याची भीती, दडपण मुलांच्या मनाला अजिबात शिवत नाही. मुक्तपणानं व्यक्त होण्याची मुभा असते. एरवी ही कथित अपयशाची भीती मुलांच्या मनाला एखाद्या भुंग्यासारखी कुरतडत असते. ही भीती मुलांच्या नैसर्गिक अभिव्यक्तीत अडथळे निर्माण करते. शिकण्याची गती मंद करते. इथं वर्गातलं वातावरण अनौपचारिक असल्यानं शिकणं सहज, आनंददायी होतं. शिक्षक शिकवताय आणि मुलं ‘हाताची घडी’ करून बसलेली आहेत, या पारंपारिक वर्गचित्राला छेद देणारं रचनावादी शिक्षणाला अभिप्रेत असलेल्या वर्गाचं अत्यंत जिंवत प्रारूप इथं साकारताना दिसतं.

ज्ञानमीमांसाशास्राच्या अभ्यासकांच्या मते, ज्ञान एकसंध असतं. आपल्या शिकण्या-शिकवण्याच्या सोयीसाठी आम्ही भूगोल, इतिहास,  जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित असे वेगवेगळे विषय आणि अभ्यास शाखांत वर्गीकरण केलं आहे. प्राथमिक शिक्षणात भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्र, कला असे विविध विषय बहुआयामी-बहुअंगी, एकात्म पद्धतीनं शिकवण्याचे आग्रह धरले जातात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विविध विषयांचा समवाय साधत झालेलं शिक्षण जास्त परिणामकारक होतं. धारणा पक्क्या झाल्यानं विषय किंवा मुद्दा दीर्घ काळ लक्षात रहायला मदत होते. दोन वर्षांपूर्वी एक शिक्षिका अविश्वास व्यक्त करत म्हणाली, "दुसरीच्या वर्गातली मुलं इतके शब्द, वाक्ये कसे काय सांगतात? मला हे खरं नाही वाटत." मी म्हटलं "आधी हे तुम्ही तुमच्या वर्गात करुन बघा, मग आपण बोलू." एके दिवशी त्यांनी फळयावर लिहिलेल्या मजकुराचा फोटो पाठवला. "मुलांना इतक्या गोष्टी माहिती असतील, याची पुसटशी कल्पना नव्हती," असंही मोकळेपणानं कळवलं. मुलांना खूप काही येत असतं, हेच प्रौढ व्यक्तींच्या गावी नसतं. अविश्वासातून बनलेल्या विशिष्ट धारणेमुळं लहान मुलांची केवढी गोची होत असणार!

वर्गातल्या या कामाविषयीचे अनुभव लिहून समाजमाध्यमांत वेळोवेळी शेअर केले. त्याचं राज्यभरातले अनेक शिक्षक अनुकरण करताहेत. त्यांचेही अनुभव अश्वासक आहेत.  वेगवेगळ्या विषयांवर शिक्षक मुलांना बोलते करताय. सुरुवातीच्या काळात भाषा शिक्षणासाठी याचा चांगला उपयोग होत असल्याचे शिक्षक आवर्जून सांगताय. याला कोणी ‘माइंड मॅप’ म्हणताय तर कोणी 'थिमबेस्ड लर्निंग' म्हणताय. शिक्षण क्षेत्रातले जाणकार या उपक्रमाला प्रकल्प पद्धतीच्या दिशेनं टाकलेलं एक दमदार पाऊल मानतात. ते काहीही असो, वर्गातल्या सगळ्या मुलांना सामावून घेणारं, बोलतं-शिकतं करणारं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणारं, विविध विषय एकात्मिक-बहुआयामी पद्धतीनं, सर्वंकष विचार करून, अर्थपूर्ण शिकायला-शिकवायला मदत करणारं, मुलांच्या व्यक्त होण्याचा पूर्णपणे आदर करत त्यांच्या विचारवृत्ती जोपासत त्यांना संवादाचं खतपाणी घालणारं एक चांगलं साधन शिक्षकांच्या हाती आलं आहे, हे नक्की. ते वापरताना मुलांच्या मनाची मशागत करायची आवश्यकता असते. त्यासाठी शिक्षकांची तयारी महत्त्वाची. शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेचं यातून आपसूकच लोकशाहीकरण होतं. अनेकदा शिक्षकांना बंद दिसणारा मुलांच्या मनाचा दरवाजा या उपक्रमामुळं किलकिला होतोय. ही प्रक्रिया सतत घडत राहिली तर मुलांच्या मनाचा दरवाजा उघडायला मोठी मदत होईल. मुलांचं मन शिक्षकांना कळू शकेल. असं झाल्यास शिक्षणात काय बहार येईल नाही?

मोबाइल- 9422855151

_लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव शाळेत शिक्षक असून, अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक आहेत._

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख